विद्यार्थी येति घरा – तोचि दिवाळी दसरा !

मंडळी, आपल्या म्युनिक शहर आणि परिसरात उच्च शिक्षणासाठी बरेच विद्यार्थी महाराष्ट्रातून येतात. हे विद्यार्थी कुटुंबीयांपासून दूर एकटे राहत असतात. दिवाळी-दसऱ्यासारखे सण आले की त्यांना साहजिकच आपल्या कुटुंबीयांची खूप आठवण येत असते. आजकालच्या virtual युगात व्हिडिओ कॉल वगैरे सारख्या माध्यमातून ते त्यांची दिवाळी आभासी स्वरूपात का होईना पण आपल्या कुटुंबियांसोबत साजरी करण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ह्या मानसिक स्थितीचा अनुभव आपल्या विद्यार्थी जीवनात नक्कीच घेतला असेल.

ह्या गोष्टीचा विचार करून आम्ही महाराष्ट्र मंडळ म्युनिक तर्फे २०२१ पासून खास विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम केला – “विद्यार्थी येति घरा – तोचि दिवाळी दसरा”. या उपक्रमाअंतर्गत म्युनिक मधील मराठी कुटुंबांनी दिवाळीच्या चार-पाच दिवसांमध्ये आपल्या सोयीप्रमाणे किमान एका मराठी विद्यार्थ्याला – विद्यार्थिनीला आपल्या घरी फराळ किंवा भोजनाला आमंत्रित केले होते. त्यानिमित्ताने त्या विद्यार्थी – विद्यार्थिनीला दूरदेशी राहूनही दिवाळीचा खराखुरा आनंद आपल्यासोबत साजरा करता आला. मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर सुरु केलेला हा उपक्रम यावर्षी आम्ही मोठ्या प्रमाणावर, आपणां सर्वांच्या सहभागाने पुढे नेणार आहोत.

हा उपक्रम पूर्णपणे ऐच्छिक आहे. इथे राहणारी सर्व कुटुंबे आपापल्या रोजच्या दिनक्रमात व्यस्त असतात. म्हणूनच प्रत्येकाने आपली सोय बघून किमान एका विद्यार्थ्याला दिवाळीच्या आठवड्यात आपल्या घरी बोलवावे. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची यादी आणि संपर्क मंडळातर्फे देण्यात येईल. आम्ही कार्यकारिणीचे सर्व सभासद ह्या उपक्रमात सहभागी होणार आहोत. आम्ही आपणासही यात सहभागी होण्याची विनंती करत आहोत.

ह्या उपक्रमात सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी आवश्यक माहिती या फॅार्मवर भरावी